आयुर्वेद: तुळस

Go down

आयुर्वेद: तुळस  Empty आयुर्वेद: तुळस

Post  Admin on Thu 10 Nov 2011, 9:49 pm

तुळस हे घरगुती औषध म्हणून उत्तम आहेच, पण आयुर्वेदिक औषधे बनवितानासुद्धा तुळस मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. औषध घेताना अनुपान म्हणूनही तुळशीचा रस वापरला जातो. तुळसीची पाने, बी आणि मूळ औषधात वापरले जाते.

भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला, वृक्षांना, फुला-फळांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. वडाची पूजा, आवळीभोजन, तुळशीचे लग्न वगैरे परंपरा वनस्पतींचा आदर करणे, त्यांचे संरक्षण करणे, वर्धन करणे, त्यांना आपल्या घरातील सदस्याप्रमाणे मानणे, हे आपल्या मनावर बिंबावे यासाठी मुद्दाम सुरू झालेल्या असाव्यात. वनस्पतींना एवढे महत्त्व असण्यामागचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्यात असलेली आरोग्यरक्षणाची क्षमता. अंगणातील किंवा कुंडीतील साध्या वनस्पतींमध्ये किती उत्तमोत्तम गुण आहेत, हे पाहिले तर आश्‍चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

प्रत्येक घरात असायलाच हवी अशी तुळस पूजेसाठी, कृष्णाला-विष्णूला वाहण्यासाठी तर वापरतातच, पण दर वर्षी तुळशीविवाह करण्याचीही पद्धत असते. तुळशी हे घरगुती औषध म्हणून उत्तम आहेच, पण आयुर्वेदिक औषधे बनवितानासुद्धा तुळशी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. औषध घेताना अनुपान म्हणूनही तुळशीचा रस वापरला जातो. तुळसीची पाने, बी आणि मूळ औषधात वापरले जातात.

वनस्पतिशास्त्रानुसार तुळशीला ऑसिमम सॅन्क्‍टम (Ocimum scantum) म्हटले जाते. यातील ऑसिमम शब्दाचा अर्थ गंध असा आहे, तर सॅन्क्‍टम शब्द पवित्र या अर्थाने आला आहे.

तुळशी संपूर्ण भारतात उगवते, तिचे कृष्ण तुळस आणि पांढरी, हिरवी किंवा रामतुळस असे दोन मुख्य प्रकार असतात. कृष्ण तुळस पांढऱ्या तुळशीपेक्षा अधिक गुणकारी असते. तुळशीला मंजिऱ्या येतात. मंजिऱ्यांमध्ये बारीक बी धरते. मंजिऱ्या आल्या की तुळशीच्या पानातील गुण कमी होतो, असे सांगितले जाते.

त्यामुळे औषधासाठी तुळशीची पाने हवी असतील तेव्हा ती मंजिऱ्या न आलेल्या तुळशीची घ्यायची पद्धत आहे.

तुळस औषधी गुणांची
आयुर्वेदिक ग्रंथात तुळशीचे गुणधर्म पुढीलप्रमाणे दिलेले आहेत-
कटु तिक्‍ता हृद्योष्णा दाहपित्तकारिणी दीपनी कुष्ठकृच्छ्ररक्‍तपित्त पार्श्‍वशूलहिक्काश्‍वासकासविषपूतिगन्धकफनाशिनी।
...रसरत्नसमुच्चय


रस - तिखट, कडू व तुरट
वीर्य - उष्ण
विपाक - तिखट
गुण - लघू, रूक्ष, तीक्ष्ण व सुगंधी
या प्रकारे आपल्या रस, वीर्य, विपाक व गुणांच्या योगे तुळशी पुढील शरीरभावांवर काम करते-

हृद्य - हृदयासाठी हितकर असते.
दीपनी - जाठराग्नीला उत्तेजित करते.
रक्‍तवहस्रोतस - त्वचाविकारांवर उपयुक्‍त असते.
प्राणवहस्रोतस - खोकला, दमा, उचकी वगैरेंत उपयुक्‍त असते.

याखेरीज तुळशी शरीरातील विषद्रव्यांचा नाश करते, दुर्गंधाचा नाश करते. वात-पित्तशामक असल्याने तुळशी श्‍वसनसंस्थेवर उपयोगी पडते, तसेच ती इतरही अनेक अवयवांसाठी, संस्थांसाठी गुणकारी असते.

श्‍वसनसंस्था -

- कफयुक्‍त सर्दी, खोकला असल्यास, अंग जड होऊन ताप आला असल्यास अर्धा चमचा तुळशीचा रस व अर्धा चमचा शुद्ध मध एकत्र करून घेण्याचा उपयोग होतो.
- छातीत कफ आहे पण सुटत नाही, अशा अवस्थेमध्ये अर्धा चमचा तुळशीचा रस खडीसाखरेसह दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास लगेच बरे वाटते.
- अगदी लहान, तान्ह्या बाळाला खोकला झाल्यास, विशेषतः कफ होऊन खोकला झाल्यास थेंबभर तुळशीचा रस मधासह चाटविण्याचा फायदा होतो.
- पडसे झाल्यास, विशेषतः डोके जड होऊन सर्दी झाली असल्यास, तुळशीच्या पानांचे चूर्ण तपकिरीप्रमाणे नाकाद्वारा ओढल्यास लगेच बरे वाटते. डोक्‍यातील जडपणा, वेदना लगेच कमी होतात.
- दम्याचा त्रास असणाऱ्यांनीही अधूनमधून तुळशीचा रस मधासह किंवा खडीसाखरेसह घेण्याची सवय ठेवावी. दमट हवामानात किंवा दम्याचा त्रास सुरू होईल, अशी लक्षणे दिसायला लागली की त्रास वाढण्याआधीच सितोपलादी चूर्ण किंवा वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणसॅन योगसारखे चूर्ण मध व तुळशीच्या रसातून घेणे चांगले असते.
- पाणी पिऊनही जी उचकी थांबत नाही, त्यावर तुळशीचा रस व मधाचे मिश्रण थोडे थोडे चाटण्याचा उपयोग होतो.
- कफाचा ताप असल्यास म्हणजे अजिबात भूक लागत नाही, जीभ पांढरी होते, तहान लागत नाही, अंग जड होते, अशी लक्षणे असणारा ताप असल्यास अर्धा चमचा तुळशीचा रस अर्धा-पाऊण चमचा मधाबरोबर घेतल्यास घाम येऊन ताप उतरण्यास मदत मिळते.

पचनसंस्थेसाठी तुळस

- भूक लागत नसली, जिभेवर पांढरा थर साठला असला तर तुळशीची पाने चावून खाण्याचा किंवा मधासह तुळशीचा रस घेण्याचा उपयोग होतो.
- तुळशीला शूलघ्नी असे पर्यायी नाव आहे. पोट दुखत असल्यास लिंबाचा रस, तुळशीचा रस व मध हे मिश्रण घेण्याचा उपयोग होतो.
- लहान मुलांना कफयुक्‍त उलटी होत असल्यास सकाळी तुळशीच्या पानांचा पाव चमचा रस मधासह देण्याचा उपयोग होतो.
- आव झाली असता, कुंथून कुंथून शौचाला होत असता तुळशीचे बी पाण्यात भिजवून ते उमलले की त्याची खीर घेण्याचा उपयोग होतो.
- उलट्या व जुलाब असे दोन्ही त्रास एकदम होत असतील तर तुळशीचे बी पाण्यात भिजवून कोळून ते पाणी पिण्याने बरे वाटते.

मूत्रवहसंस्थेसाठी तुळस बी

- तुळशीचे बी मूत्रल म्हणजे लघवी साफ होण्यास मदत करणारे असते. लघवी अडखळत होणे, जळजळणे वगैरे त्रास होत असल्यास तुळशीचे बी रात्रभर पाण्यात भिजवावे, उललेले बी सकाळी हाताने कुस्करून घ्यावे व गाळून घेतलेले पाणी प्यावे. याने मूत्रमार्गाचा क्षोभ लगेच कमी होतो.
- वारंवार मुतखडा होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी तुळशीच्या बियांचे पाणी किंवा पाण्यात भिजवलेल्या तुळशीच्या बियांची खीर खाणे चांगले असते.

रक्‍तवहस्रोतसाठी तुळशीरस

- तुळशी जंतुनाशक असते. रक्‍तशुद्धीसाठीही उत्तम असते. विशेषतः ज्या त्वचारोगांमध्ये खाजेचे प्रमाण अधिक असते, त्यावर तुळशी उत्तम असते. खाज कमी होण्यासाठी तुळशीच्या पानांचा रस चोळण्याचा उपयोग होतो.
- नायट्याच्या डागांवर बाहेरून तुळशीच्या पानांचा रस चोळण्याने डाग कमी होण्यास मदत मिळते.
- गांधिलमाशी किंवा इतर कोणताही किडा चावला तर त्यावर लगेच तुळशीचा रस चोळण्याने बरे वाटते.


अजून काही
तुळशीच्या झाडाजवळ मलेरियाचे डास सापडत नाहीत, त्यामुळे घराजवळ तुळशी अवश्‍य असावी. विशेषतः दमट हवामान असणाऱ्या प्रदेशात प्रत्येक घरात तुळशी असायलाच हवी.

तुळशीचा चहा
- तुळशी, आले, गवती चहा, पुदिन्याची पाने यांचा साखरेसह बनवलेला चहा (चहापत्तीशिवाय बनविलेला चहा) अतिशय रुचकर असतो, पचनास मदत करतो, सर्दी-ताप-खोकला वगैरे त्रासांना प्रतिबंध करतो. विशेषतः पावसाळ्यात व थंडीच्या दिवसांत असा चहा पिणे फायद्याचे असते. चार कप चहा बनविण्यासाठी सात-आठ तुळशीची पाने, दोन गवती चहाच्या पाती, थोडेसे आले, चार-पाच पुदिन्याची पाने, चवीनुसार तीन-चार चमचे साखर घ्यावी. पाण्याला उकळी फुटली की त्यात या सर्व गोष्टी टाकाव्यात. एक-दोन मिनिटे मंद आचेवर उकळले की वर झाकण ठेवून गॅस बंद करावा. पाच मिनिटांनी तुळशीचा चहा गाळून घ्यावा व गरम असताना प्यावा.

या प्रकारे तुळशी घराघरात असायलाच हवी, अशी बहुगुणी वनस्पती आहे. पूजेअर्चेच्या निमित्ताने तिला आपलेसे केले आणि गरजेनुसार वापरले तर आरोग्याचा लाभ होण्यासाठी निश्‍चितच हातभार लागेल.

Admin
Admin

Posts : 62
Join date : 2011-03-22
Location : Pune

http://sampurnackp.co.cc

Back to top Go down

Back to top


 
Permissions in this forum:
You cannot reply to topics in this forum